प्रवास
प्रवास
प्रवास! प्रवास म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन धावणारा रस्ता, पळणारी झाडे, खिडकी बाहेर काढलेला हात आणि चेहऱ्यावरचा थंड वारा! असे चित्र उभे राहते. वेगवेगळ्या लोकांसाठी प्रवासाचे वेगवेगळे संदर्भ असतात. प्रवास म्हणजे एक अनोळखी, अपरिचित रस्त्यावर घेऊन जाणारा. कधी साधा सरळ तर कधी खाचखळग्यांनी भरलेला, वेदना- यातना देणारा. प्रवास हा निर्मिती करणारा असतो. नवीन विचारांची, मूल्यांची तर कधी परिचय करून देणारा असतो नवीन विश्वाशी, माणसांशी आणि कधी तर स्वतःशीच! प्रवासात कितीही जण सोबत असले, शरीराने, मनाने तरी प्रवास हा शेवटी एकट्याचाच असतो.
गर्भाचा, मातेच्या उदरात नऊ महिन्यांचा प्रवास देखील असाच. मातेशी नाळ जोडलेला परंतु प्रवास मात्र एकट्याचाच. मातेच्या उदरात त्याचे विश्व असणारा. हा प्रवासही असाच अवघड, कठीण, जीवाची घालमेल करणारा परंतु एक सुंदर निर्मिती करणारा. सगळे प्रवास असेच असतात का?
जगात आल्यावर सुद्धा प्रवास काही थांबत नाही. जीवनाच्या प्रवासाचा पल्ला काहींसाठी लांब तर काहींसाठी छोटा. या प्रवासात अनेकांशी भेट घडवणारा. स्वप्न, सुख-दुःख, आशा-निराशा या सगळ्यांशी टप्प्याटप्प्याने ओळख करून देणारा. माणसाला समृद्ध करणारा. पुढच्या पिढीला ज्ञान देण्यास प्रवृत्त करणारा. असा हा प्रवास प्रगतीचे द्योतकच म्हणायला हवे.
जग प्रवास हा निराळाच. साहस आणि कुतूहलाने भरलेला. या कुतुहलामुळेच नवीन देशांची माहिती देणारा. जग प्रवासामुळे अनेक देशांची एकमेकांशी ओळख करून देणारा. व्यापार, संस्कार, धर्म, शिक्षण, ज्ञान, कला यांची देवाण-घेवाण करणारा. माणसाला माणसाजवळ नेणारा. दुरावा कमी करणारा. प्रवास असाच असतो जवळीक वाढवणारा!
प्रवास फक्त मनुष्यच नाही तर पक्षी, प्राणी, वनस्पती, पाखरे कीटक, झाडेसुद्धा करतात. प्रजननासाठी पक्षी स्थलांतर करतात. मासे सुद्धा उष्ण आणि थंड प्रदेशात खूप लांबचा प्रवास करतात. झाडांच्या बिया तर हवे सोबत कित्येक ठिकाणी प्रवास करतात आणि तेथे वन निर्मितीला हातभार लावतात. हे सगळे एकत्र येऊन आपल्या प्रवासामुळे एक सुंदर विश्वच निर्माण करतात. एक निरंतर आणि अखंड प्रवास, कदाचित कधीही न संपणारा आणि अत्यावश्यक असणारा!
एका मनाचा दुसऱ्या मना पर्यंतचा प्रवास खूपच जटिल. ज्याला आपण मनकवडे म्हणतो त्यांना हा प्रवास थोडा सोपा आणि मजेशीर वाटतो. दुसऱ्याच्या मना पर्यंत पोहोचायला कधीकधी आयुष्य खर्ची करावे लागते. बरं, मन सतत रंग बदलत असते त्यामुळे कोणाचे मन संपूर्ण ओळखणे, कळणे जरा कठीणच. काही अंशी दुसऱ्यांच्या मना पर्यंतचा प्रवास खेळकर असतो. तेथे मैत्री होते नातेसंबंध निर्माण होतात. परंतु, आईच्या आपल्या मुलाच्या मना पर्यंतच्या प्रवासाची खोली, कुठलेच मन गाठू शकत नाही! दुसऱ्या मना पर्यंतचा प्रवास खरंच खुप अवघड आणि सतत पडताळणी करायला लावणारा.
स्वतःच्या मनाचा प्रवासही असाच. एकदम भन्नाट ! काही सेकंदात मोठा फेरफटका मारुन येणारा. विचार करणाऱ्याला थक्क करणारा. मनातील विचारांची सुरुवात कशी झाली हे तपासताना स्वतःलाच आश्चर्य होईल असा. मनाची चंचलता सर्वांनाच माहित आहे. धावणारा ..एका भावनेतून दुसऱ्या भावनेत उडी मारणारा.. न थांबणारा, सतत काही ना काही विचार करणारा. मनाचा प्रवास असाच अविरत, सगळे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारा. कधी कोमेजुन जाणारा आणि कधी अचानक नकळत फुलून उंच भरारी घेणारा. स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा ..मनाचा प्रवास!
माणसाचा शेवटचा प्रवास ही खूप काही शिकवणारा. जाणाऱ्याला सुद्धा आणि मागे राहणार्यांना सुद्धा. मोक्ष प्राप्तीचा प्रवासही असाच वर्षभराचा परंतु पूर्ण आयुष्याची बेरीज वजाबाकी करणारा, पाप-पुण्याचे मोज माप करणारा. ज्या प्रियजनांना तो सोडून गेला त्यांचा प्रवास ही कठीणच असतो. एक पोकळी निर्माण करणारा. हा प्रवास ही काही सोपा नसतो. ह्या पोकळीतून बाहेर येऊन जगाशी परत एकरूप होईपर्यंतचा त्यांचा प्रवास ही यातना देणारा असतो. परंतु प्रवास तर सतत, निरंतर चालणारा तो तर चालूच असतो!
अवकाशातले सूर्य, पृथ्वी, चंद्र, ग्रह, तारे यांचा प्रवासही असाच. अखंड .नियमाने चालणारा. लयबद्ध. कोणीही कोणाच्या प्रवासात अडथळा न करणारा, ना आपली नियोजित गती वाढवणारा ना कमी करणारा. एकाग्रतेने विश्वाची जोपासना करणारा. रक्षा करणारा. आपल्या प्रवासात सर्व प्रवासांना सामावून घेणारा!
असा हा प्रवास ! असफलते कडून सफलतेकडे जाणारा .भौतिकते कडून अध्यात्माकडे जाणारा. माणसांना माणसांशी जोडणारा. संस्कार, मुल्ये, शिक्षण, धर्म, कला, ज्ञान यांची देवाण-घेवाण करणारा. जगाला नवीन गोष्टी देणारा. जगाची प्रगती करणारा. नवनिर्मिती करणारा. एका निर्मिती कडून दुसऱ्या निर्मितीकडे नेणारा.कधी अवघड. कधी सोपा. कधी अचानक मनावर आदळलेला! स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा. निरंतर, सतत - एका न थांबणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहणारा !आणि हो, जेवढा प्रवास अवघड तेवढे ध्येयपूर्तीचे, निर्मितीचे समाधान अधिक.
सगळ्यांनीच त्यामुळे सतत प्रवास करायला हवा कधी शरीराने तर कधी मनाने...!!
ममता पार्सेकर.
माझे इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://myboligrafo.blogspot.com/2020/08/blog-post_17.html

बहोत बढीया
ReplyDelete😊🙏
DeleteSuperbbly penned down 👏👏👏👏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच सुंदर
Delete