माझ्या मनातला गणपती



 माझ्या मनातला गणपती

खरं म्हणजे मूर्तीपूजा आणि देव या भिन्न संकल्पना. मनातले सिद्धांत, संस्कार, तत्व जपायची असेल तर रोज त्यांची उजळणी करावी लागते. आपले मन मूर्तस्वरूपाला पटकन स्वीकारते. त्यामुळे देव-देवतांच्या मूर्तस्वरूपा मागील सिद्धांत,संकल्पना समजणे आणि आचरणात आणणे गरजेचे आहे.

माझ्या मनातला गणपती हा असाच आहे, अनेक सिद्धांतानी भरलेला. चौदा विद्यांचा स्वामी आणि कलेची आदर करायला शिकवणारा चौसष्ट कलांचा अधिपती. प्रत्येक कलेच्या सुरुवातीला ज्याचे नमन करून वंदना केली जाते तो अथर्व. भौतिक आणि अध्यात्मिक अडचणीतून मार्ग दाखवणारा असा हा अयान. पार्वतीमातेचे द्वारपाल होऊन रक्षण करणारा आणि आज प्रत्येक गाव, वेशी, मंदिर, किल्ला, गड येथे द्वाराशी पूजला जाणारा विघ्नेश्वर. 

गण म्हणजे सर्व सजीव-निर्जीव सृष्टी, इंद्रिये, तत्व, वैश्विक ऊर्जा यांचा समूह. हे सर्व समूह एकत्रित येऊन विश्व निर्माण करतात. आपण जर या समूहांना पुजले नाही तर आपले पूजन अपूर्ण राहते. त्यामुळे सृष्टीच्या प्रत्येक गणाला पुजन्यापेक्षा आपण त्यांचा नेता गणपतीला पुजतो आणि प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला त्यांचा आशीर्वाद घेऊन कार्यसिद्धीची याचना करतो.

गजाननाचे मोठे मस्तक हे प्रतीक आहे स्वतःपुरता मर्यादित विचार न करता पूर्ण चराचर सृष्टीचा विचार करण्याचा.  आपला अभिमान बाजूला ठेवून आपल्या विचारांनी सर्वांचे कल्याण करण्याचा.गणेशाच्या मोठ्या कर्णाप्रमाणे ऐकावे सगळे परंतु आत्मसात तेवढेच करावे ज्याने  सगळ्यांचे भले होईल. वक्रतुंडा च्या सोंडे प्रमाणे समोर मोह जाळाचे पक्वान्न असतानाही मोदकाप्रमाणे फक्त चांगल्या गोष्टीच उचलाव्या. एकदंता प्रमाणे जगाच्या संकटांना न घाबरता सामोरे जाऊन त्या पेलून धराव्या .लंबोदरा प्रमाणेच दुसऱ्यांच्या चुका, अपराध आपल्या पोटात सामावून सगळ्यांना क्षमा करायला हवी. गजानना प्रमाणेच आपल्या स्वभावातील उंदराला, जे तमोगुणाचे प्रतीक आहे, आपल्या पायाशी ठेवावे. कुठलीही गोष्ट बारकाईने बघतांना गजानना प्रमाणे डोळे बारीक करायलाच लागतात ! 

या रिद्धेशाला, जातीच्या, धर्माच्या, देशाच्या सीमा नाहीत. गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती श्रीलंकेत आहे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात निर्मिली गेलीली! चीन, थायलंड, इंडोनेशिया, अफगाणिस्थान, व्हिएतनाम, कंबोडिया व इतर अनेक देशात शतकानुशतके या सर्वतमानची पूजा केली जाते. नवसाचा गणपती पारसी, पंजाबी, सिंधी, ख्रिस्ती, आणि मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा पुजला जातो.

 परंतु आज अशी स्थिती आहे की मनुष्य मूर्त रूपा मागील  सिद्धांतापासून दूर जात आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या सामाजिक ऐक्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना आणली त्यालाच तडा गेला आहे. मूर्तीला प्राधान्य येऊन आज या उत्सवाचा बाजार झाला आहे. या बुद्धीच्या देवता, प्रज्ञेशाकडून आज बरेच काही शिकायची आवश्यकता आहे. अंधश्रद्धा आणि अज्ञानाचे कुंठित दरवाजे तोडून आपल्या बुद्धीच्या दाही दिशा ज्ञानाने प्रकाशित करायची नितांत गरज आहे.देवा मागच्या संकल्पना, उद्देश समजून आचरणात आणायची हीच खरी  वेळ आहे. 

आत्ताची परिस्थिती पाहता या विघ्नेशाकडून मानसिक बळ घेऊन सगळ्यांनी एकजूट होऊन "कोरोना" चे हे संकट समूळ नष्ट करायचे आहे. यावर्षी सामाजिक एकात्मतेचे दर्शन सगळ्यांनी सार्वजनिक  गणेश उत्सव साजरा न करता घरातच गणेश उत्सव साजरा करून करायला हवे.

 या वर्षी खऱ्या अर्थाने लविन होऊन या मूर्त स्वरूपाच्या सिद्धांतांचा, संकल्पनांचा, तत्वांचा दरवळ पसरवू या...

🌺🌺 

ममता पार्सेकर 

Comments

  1. खुप छान मनातला गणपति सुरेख

    ReplyDelete
  2. खूप छान आहे 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रवास

घराबाहेरच्या जगात आम्ही..१