घराबाहेरच्या जगात आम्ही..१

                          

                घराबाहेरच्या जगात आम्ही ....भाग १

मी पटापट सुटकेस भरत होते. सगळ्या सामानांची यादी पलंगावरच ठेवली होती.काय बरोबर न्यायचे काय नाही हे सगळ्या मैत्रिणींचे आधीच ठरले होते.तशी एक लिस्टच व्हाट्सअप वर टाकली होती.सोबत घेऊन जायच्या सामानांची तयारी तर महिन्याभरापासून सुरू होती. काही मैत्रिणींची तर तीन महिन्यापासून!  काय एवढी तयारी करतात या कोण जाणे! हात सुटकेस भरण्याचे काम करत असताना मेंदू घरच्या राहिलेल्या कामाचा आढावा घेत होता. फ्लाईट रात्री दहा वाजता ची होती त्यामुळे पूर्ण दिवस हातात होता .सगळ्यात महत्त्वाचे काम ब्युटी पार्लरचे, ते कालच झाले होते आता ही पॅकिंग झाली की फक्त जेवणाचे बघायचे होते.चटणी ,लोणचे तर होतेच पण अशावेळेस "मॅगी " चा खूपच आधार असतो.

श्रीविष्णूची पोज घेऊन पलंगावर विराजमान झालेला नवरा माझ्या लगबगी कडे बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता. न राहवून शेवटी त्याने वाक्य फेकलेच, "एवढा उत्साह, तर तुला आपल्या हनिमूनच्या पॅकिंग च्या वेळेस सुद्धा नव्हता." छान उत्तर डोक्यात सुचले होते पण काही वेळेस उत्तर न देणेच योग्य असते .

"मम्मी ,आता लेहला एवढ्या थंडीत तुम्ही शॉर्टस घालणार ?" इती मुलगा. हा सुद्धा बापाला सामील झाला. आता यांना काय सांगू? आणि हे समजतील?

 सुटकेस भरता भरता माझ्या विचारांची गाडी घर कामातून मैत्रिणींकडे वळली.सगळ्या मैत्रिणी चाळीस-पंचेचाळीस च्या. रोजच्या रहाटगाड्या ने त्रस्त झालेल्या. रोज उठा. आपलं  करा, नवऱ्याचं करा, मुलांच करा .सुट्टी मध्ये कुठे फिरायला गेलो तरी या नियमांत काही बदल होत नाही .तेथेसुद्धा टॉवेल दे ,कपडे दे, आई भूक लागली, केवढी मोठ्यांदा हसते,लोक बघत आहेत हे काय लहान मुलासारखा, हे काय घातलंय, केवढा मेकअप , मोकळे केस  चांगले नाही दिसत.असं सतत चालू असत.सगळ्या मैत्रिणींची हीच कथा. 

कसं कोणास ठाऊक २०१५ मधे मैत्रिणींची या विषयावर खूप गंभीर आणि तावातावाची बैठक झाली. बैठकीचा वादावादीनंतर चा निर्णय तर एकदमच अकल्पित होता .फक्त आम्ही मैत्रिणी ट्रीप ला जाणार ,मुलेही नको आणि नवराही नको, फक्त आम्ही .या ऐतिहासिक निर्णयानंतर  प्रत्येक वर्षी मुलांच्या परीक्षा संपल्या की एप्रिल मध्ये आमची ट्रीप ठरलेली. या निर्णयात कधी ही खंड पडला नाही. निर्णयात सामील होणाऱ्या पंधरा जणी होतो, पण प्रत्येक वेळेस निर्णयाची   अंमलबजावणीची वेळ आली की  काही ना काही कारणाने एकेक करून  मैत्रिणी गळत जायच्या. या ही वेळेस तेच झाले.कोणाला घरातून परवानगी नाही, कोणाच्या घरात सासू आजारी, कोणाच्या मुलाचा क्लास ,कोणाचे तर मन खात होते असे कसे जाऊ सगळे सोडून? मागे यांचे कसे होईल? आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला.. आपण गेल्यावर सगळ्यात जास्त आनंद त्यांनाच होणार आहे .ते ही स्वातंत्र्य अनुभवतील आणि मुलांनाही देतील मोकाट सोडून. तू चल. पण नाहीच. अशा विविध कारणांनी शेवटी तिकीट बुकिंग च्या वेळेस फक्त आठजणी उरल्या .मग नेहमी प्रमाणे जेवढ्या येतील तेवढ्या जाऊया असे ठरवून आम्ही पुढच्या तयारीला लागलो .

"मम्मी, हे काय साडी सुद्धा घेतली?" मुलाने परत तंद्री भंग केली.

" हो. शॉर्टस पासून साडी पर्यंत सगळं घालणार आहोत. तुला फोटो सुद्धा पाठवेन." मी उत्साहाने बोलायला सुरुवात केली, "प्रत्येक दिवसाचे प्लॅनिंग आहे ,पहिल्या दिवशी 'एयरपोर्ट लुक' आहे जीन्स आणि ......"

माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच मुलगा  चेहऱ्यावर विचित्र भाव घेऊन  खोलीतून गेला .मला आपल  उगाच वाटलं, हा मला 'गॉन केस 'समजला की काय ?नवरा मात्र खोलीतच होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरले होते .मुलगा त्यांच्या मनातलं बोलला की काय?

मी विमानाचे तिकिट हॅण्ड बॅगमध्ये टाकले .सगळ्या मैत्रिणीनी ठरवले होते प्रत्येक दिवशी काय घालायचे ते. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक हौशी मैत्रीण असते ,जी कधी काय घालायचं ते ठरवत असते, तिचे फक्त ऐकायचे आणि डोक्याला जास्त  ताप केला नाही की तुम्ही खूप मजा करू शकता.सगळ्यांनी ठरवलं होतं  ती जे काय घालायला सांगते सगळ्या जणींनी गप्पपणे, वादविवाद न करता ऐकायचे .आजपर्यंत  शॉर्ट्स कधी घातली नव्हती ती चार दिवसापूर्वी खरेदी केली. अशा अनेक गोष्टी खरेदी कराव्या लागल्या. पण मजा येते हं, हे सगळं करताना! आतले कपडे खरेदी करताना तर सगळ्याजणी मॉलमध्ये एकत्र गेलो होतो आणि जी धमाल केली होती की   मॉल वाली मुलगी आमचे" ट्रायल्स "आणि मजा-मस्ती बघून वरमली होती .

"एकटीच काय हसतेस अशी ?"नवरा बघत म्हणाला.

"थँक्यू !मला जायला परवानगी दिली म्हणून", मी ही लाडात  म्हणाले.

नेमकं ह्याच वेळेस त्यांचा फोन वाजला आणि ते फोन मध्ये बिझी झाले आणि मी परत माझ्या पॅकिंगमध्ये .एअरपोर्टला जाताना जीन्स आणि टॉप घालायचे ठरले होते तो बाजूला काढला. औषधांची यादी ...आता पैशा नंतर हीच यादी महत्त्वाची ! 

परत एकदा व्हाट्सअप ग्रुप उघडला काही राहिले आहे का बघायला. अरे बापरे !एवढे मेसेज? सगळ्याच घाईगडबडीत होत्या, व्हाट्सअप वर सुद्धा ती धांदल आणि उत्साह ओसंडून वाहत होता. होटेल बुकिंग, एअर टिकीट, कार बुकिंग चे फोटो शेअर केले होते. कुठे भेटायचं ,कोण कोणाबरोबर जाणार , नाश्ता कोण घेणार असा सगळा लेहच्या नावाने गोंधळ चालू होता . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्या मैत्रिणींच्या नवर्‍यांचा एक व्हाट्सअप ग्रुप बनवला होता, जेणेकरून गरज पडलीच तर ते एकमेकांकडे आमची चौकशी करू शकतील .मला आपल उगाच वाटलं हे सगळे नवरे एकत्र येऊन पार्टी करतील-  तुझी गेली ना ?माझी पण गेली ! चिअर्स!

आम्ही ही  "चिअर्स "साठी ब्रँडी घेतली होती. लेहला थंडीत गरज पडलीच तर. तसंही शॉर्ट्स प्रमाणे तेही करण्याच होतच यादीत .हे थंडीचे बूट्स बहुतेक  हॅण्ड  बॅगेज मध्ये टाकावे लागतील.

 हुश्श्श! झाले एकदाचे . आता फक्त जाताना मोबाईल चार्जर आणि घरच्या चाव्या त्या राहतील.  बेडरूम मधून किचन मध्ये आले वाया मुलाचा बेडरूम, तर मुलगा बिझी होता 'पब्जी' खेळण्यात .त्याची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती त्यामुळे  जास्त 'आईगिरी 'करू शकत नव्हते. किचनमध्ये आले आणि एकदम चहाची तल्लफ आली. नवरोबा अजून फोन वरच होते. गरमागरम चहा केला आणि कप हातात घेऊन माझ्या फेवरेट जागेत बसले, माझी बेडरूमची खिडकी ! आणि परत मन धावायला लागले. सगळ्या मैत्रिणी आजूबाजूला राहणाऱ्या. मुलांच्या मुळे आमच्या ओळखी झाल्या .सगळ्या संध्याकाळी आपापल्या मुलांना समोरच्या गार्डनमध्ये घेऊन यायच्या. मुले मातीत खेळायची आम्ही बाकावर बसून गप्पा मारायचो.हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.  मागच्या वर्षी लेह लडाख जायचे ठरले आणि वर्ष कसे गेले कळलेच नाही. कुठे जायचे ,ट्रेन ने की विमानाने, बजेट ,हॉटेल बुकिंग, टिकीट बुकिंग  ,किती दिवस जायचं ,कुठे कुठे फिरायचं ,काय काय बघायचं, एअरपोर्ट ला कसं जायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी वजन कमी करायच! हे सगळं ठरवताना खूप वेळा भेटलो. व्हाट्सअप ग्रुप बनवला .कधी एकदा जायची तारीख येते असं झालं होतं. 

सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता तो म्हणजे आठ दिवस मुलगा आणि नवरा कसे राहतील.पुढच्या दोन दिवसाचे जेवण बनवले होते पण बाकीचे दिवस ?कोणी  डबावाला ठेवला कोणी मदतीला बहिणीला बोलावले  कोणी आईला बोलावले आणि कोणी तर करतील मॅनेज म्हणून सोडून दिले.शेवटी आज जायचा दिवस ही उजाडला !सगळ्या जणींना एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं ते म्हणजे सगळ्यांच्या नवऱ्यांनी जायची परवानगी दिली ,ती ही मसका न लावता. त्यांच्यातला प्रेम आणि विश्वास बघून सगळ्यांनाच समाधान मिळालं.

" जा मजा करून ये" असं हसून जेव्हा नवरा म्हणाला होता  तेव्हा सगळ्यांनाच 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या पिक्चर चा डायलॉग आठवला होता.."जा सिमरन  जा...जी ले  अपनी जिंदगी!"

 आम्ही ही खरंच तेच करण्याचे ठरवल. ज्या इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण करायच्या. आवडते पदार्थ खाण्याचा ,कपडे घालण्याचा, मुक्तपणे फिरण्याचा,धिंगाना करण्याचा, मोठ्याने हसण्याचा, केस मोकळे सोडण्याचा ,हवा तसा मेकअप करण्याचा. हे आठ दिवस सर्वस्वी आमचे होते आणि ते आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे जगायचे होते.

"अगं ,नाश्ता देते ना?"

  नवऱ्याच्या या वाक्यामुळे परत भानावर आले आणि उठले. उद्याचा माझा हॉटेलमध्ये होणारा "बुफे ब्रेक फास्ट " मनात रंगवत किचनकडे वळले.

क्रमशः

ममता पार्सेकर



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझ्या मनातला गणपती

प्रवास