घराबाहेरच्या जगात आम्ही..२

घराबाहेरच्या जगात आम्ही ...................भाग 2

मी मोबाईल चार्जर आणि चाव्या पर्समध्ये टाकल्या आणि परत एकदा आरशात बघून केस व्यवस्थित केले. नीलूच्या हुकुमावरून आम्ही सगळ्यांनी जीन्स-टॉप घातला होता.  काना मागचे केस मोकळे सोडून पुढच्या केसांच्या छान बारीक बारीक वेण्या केल्या होत्या. मी पुन्हा एकदा लिपस्टिक लावली व स्वतःवरच खुश होऊन स्वतःलाच एक "फ्लाईंग किस" दिले. नवरा माझे नखरे बघत होता.  माझ्याकडे बघून म्हणाला "चल आता झालं की नाही तुझं? टॅक्सी येईल पाच मिनिटात. तुमच्या बायकांचे नखरे संपतच नाहीत."

"अहो, एक फोटो काढा ना माझा व तुमचा" आणि आश्चर्य म्हणजे विनातक्रार नवऱ्याने आमची एक सेल्फी काढली  आणि मी एकदम भावूक झाले. त्याला बिलगलेच. त्याच्या कमरेभोवती हात घालून, छातीवर डोके ठेवून म्हणाले "माझ्या मुलाची काळजी घ्या हां."

"तो माझाही मुलगा आहे समजल ना" नवरा मला दूर करत म्हणाला. इतक्यात चिरंजीव खोलीमध्ये अवतरले. त्याला प्रेमाने जवळ घेऊन मी बोलायला सुरुवात केली "वडिलांची काळजी घे, जास्त बाहेर फिरू नको, कम्प्युटरवर जास्त गेम खेळू नको मी फोन करत राहीन. बाहेरचं...."

माझं वाक्य मध्येच तोडत  मुलगा म्हणाला "बाहेरच जास्त खायचं नाही, बाहेर जाताना चावी विसरायची नाही, घराकडे लक्ष ठेवायचं आणि  मी अनोळखी काय ओळखीच्या माणसांना सुद्धा घरात घेणार नाही. चिल मॉम." आणि त्याने माझी एक बारीक वेणी टिचकी ने उडवली.

मुलाचे हे वाक्य ऐकून बरं वाटलं. म्हणजे सगळं नॉर्मल आहे. मी त्याला मिठीत घेऊन एक पप्पी घेतली आणि पटकन  सेल्फी काढली.

" माय लेकाचं प्रेम आटोपलं असेल तर चला आता. टॅक्सी आली आहे खाली."

मी हवेत तरंगतच खाली उतरले.नवऱ्याने सामान टॅक्सीत ठेवले. मीना टॅक्सी घेऊन आली होती.आम्ही दोघीही एकत्रच विमानतळावर जाणार होतो. परत एकदा मुलाला आणि नवऱ्याला बाय केले आणि आम्ही निघालो.

 टॅक्सी मध्ये बसताच आधी बाकीच्या मैत्रिणींना आम्ही फोन लावून निघालो आहे ते कळवले.त्यानंतर आमच्या दोघींची जी बडबड सुरु झाली ती विमानतळापर्यंत चालू होती. बाकीच्या मैत्रिणी सुद्धा निघाल्या होत्या. विमानतळावरच आम्ही सात ही जणी भेटणार होतो. आठवी मैत्रीण आम्हाला दिल्लीहून सामील होणार होती.

मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आले तसे अंगात पुन्हा उत्साह संचारला. विमानतळाची मजाच वेगळी! टॅक्सीतून सामान उतरवले आणि विमानतळाच्या प्रवेशद्वाराकडे निघालो.

समोरच सगळ्याजणी उभ्या होत्या. सगळ्या खूप आनंदी, उत्साही आणि टवटवीत दिसत होत्या. एकमेकींना सुंदर कपडे, छान मेकअप, मस्त केश रचना यांचे कॉम्प्लिमेंट देत मिठ्या मारल्या आणि हसत-खेळत विमानतळात प्रवेश केला. सुटकेस खेचत आम्ही एअरलाईन्सच्या काऊंटरवर सामान जमा केले. आता प्रत्येकीकडे फक्त एक हँडबॅग आणि एक गरम कपड्यांची छोटी बॅग होती जी आम्हाला लेहला उतरताना लागणार होती. आम्ही बोर्डिंग पास घेऊन विमान उड्डाणाच्या गेट कडे निघालो.

"ए, तुम्हाला सगळ्यांना थँक्यू हा, तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलं. एक सारखे कपडे घातले आणि एक सारखी हेअर स्टाईल सुद्धा केली." नीलू चालता चालता भावूक होत म्हणाली.माझा हात लगेच माझ्या केसांकडे गेला. आणि मुलाच्या आठवणीने एका छोट्या वेणीला टिचकी ने उडवले.

"तुझ्यासाठी काहीही" असे म्हणून अमिताने तिला जोरात  मिठी मारली.

"आम्ही का म्हणून मागे राहायचे ?"असे म्हणून आम्ही सगळ्याजणी एकत्रच मिठी मारण्यासाठी नीलू वर तुटून पडलो.

आजूबाजूचे लोक आमचा हा तमाशा बघत आहेत याची आम्ही बिलकुल पर्वा केली नाही. प्रेमाची मुक्तहस्ताने उधळण करायलाच तर आम्ही निघालो होतो.

विमान उड्डानाला अवकाश असल्यामुळे आम्ही ड्युटी फ्री एरियामध्ये मनसोक्त फिरलो, भरपुर फोटो काढले, पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि हसत-खिदळत, मजा मस्ती करत विमानात चढलो. विमानाने उड्डाण केले आणि आमचा मुंबई ते दिल्ली असा प्रवास सुरू झाला. सगळ्याजणी आपापल्या जागेवर बसल्या होता. मध्येच त्यांचा जोराने हसण्याचा आवाज येत होता. मी आणि बीना शेजारीच बसलो होतो. बीना मोबाईल मध्ये गुंग होती. मी शांतपणे विमाना बाहेर बघत होते. रात्रीची मुंबई अतिशय सुंदर दिसत होती. कुठे सोनेरी, कुठे चंदेरी, वळणावळणाची. साडेबारापर्यंत आम्ही  दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचू. तेथून दिल्ली आंतरदेशीय विमानतळावर जावे लागणार होते कारण आमचे लेहचे विमान दिल्ली आंतरदेशीय विमानतळावरून सकाळी सात वाजता होते. विमान परिचारिकेने नाश्ता आणला आणि मी माझ्या विचारातून बाहेर आले. खात पित, गप्पा मारत,फोटो काढत, मजा मस्ती करत दिल्ली कधी पोहोचलो हे कळलेच नाही.

दिल्ली अंतर्देशीय विमानतळावर पोहोचल्यावर एअरलाईन्सच्या काउंटरवर आम्ही सामान जमा केले आणि तेथेच हेमाची वाट पाहत बसलो. हेमा सध्या दुबईला स्थाईक असल्यामुळे ती दुबईहून दिल्लीला येणार होती. आमच्या सगळ्यांच्या नजरा सारख्या हेमा दिसते का हेच शोधत होत्या... आणि अचानक जीन्स - टॉप घातलेली  हेमा सुटकेस खेचत येताना दिसली. लांबूनच तिने आम्हाला जोरजोराने हात हलवला. तिच्या बारीक बारीक वेण्या उडवून दाखवत ती  एअरलाईन्सच्या काऊंटरवर सामान  जमा करण्यासाठी रांगेत उभी राहिली. ती सामान जमा करे पर्यंत आम्हीही दम धरुन बसलो. जसे तिने सामान जमा केले तसे ती ही न राहवून धावतच आली. एका वर्षानंतर आम्ही तिला भेटत होतो त्यामुळे सगळ्याच आनंदात होत्या. मिठयांचा कार्यक्रम आनंद अश्रू सहित पार पडला आणि दिल्ली विमानतळ ही आम्ही दणानून  सोडला.

 बोर्डिंग पास घेऊन आम्ही आमच्या विमानाच्या बोर्डिंग गेट जवळ जाऊन बसलो. सगळे सामान आम्ही एका ठिकाणी जमा केले आणि गप्पा मारत बसलो. काही वेळाने तमन्ना आणि रुबी वॉशरूम ला गेल्या. हेमा आणि मीना सुद्धा  कॉफी प्यायला उठल्या. अमिता आणि नीलूला सगळ्यांच्या सामानाकडे लक्ष ठेव्हायला सांगून मी आणि बीना दोघी ही  मोबाईल चार्जिंगची जागा शोधण्यासाठी उठलो. 

एका ठिकाणी चार्जिंग पॉईंट्स दिसले आणि आम्ही दोघी मोबाईल चार्जिंगला लावून तिथेच बसलो. उद्या काय काय करायचं याची चर्चा करत असताना अचानक आम्ही 

अमिताच्या नावाने अनाउंसमेंट ऐकली आणि सावध झालो.

" अमिता सोनी, तुम्ही जिथे कुठे असाल कृपया एअरलाईन्सच्या काऊंटर वर त्वरित यावे." आम्ही दोघीही झटपट उठलो व काय झाले आहे  हे बघायला मैत्रिणी बसल्या होत्या त्या दिशेने वळलो. अमिता एका हाताने पर्स संभाळत, दुसर्‍या हातने बॅग् सांभाळत, हिल्सच्या शूज मधे  अर्धी चालत अर्धी धावत जात होती. निलू ही,आई च्या मागे लहान मुल धडपडत पळत असते, त्याप्रमाणे अमिताच्या मागे मागे पळत होती.  त्यांना तसे धावताना बघून आम्ही दोघी ही हसायला लागलो.

" या अशा का धावत आहेत? एखादी पडली तर नवीन कथा व्हायची इथेच." मी म्हणाले .

"अग त्या बघ हेमा नी मीना ही धावतायेत त्यांच्यामागे." बिना म्हणाली .

आणि खरंच की हेमा आणि मिना  ही  स्वतःला आणि सामानाला सांभाळत थोड्या अंतराने अमिता आणि नीलूच्या   मागे मागे धावत होत्या.

" काहीतरी गडबड आहे. चल जाऊ या." मी म्हणाले .

आम्ही पटापट आमचे मोबाईलचे चार्जर काढले आणि घाईघाईने सामान ठेवले होते तिकडे निघालो. पोहोचलो तर तमन्ना आणि रुबी ही घाईगडबडीने सामान उचलून त्यांच्यामागे जायच्या तयारीत होत्या.

" काय झालं?" बिना ने  विचारलं.

" काय झालं काहीच माहित नाही. आम्ही बाथरूममधून आलो तर अमिता आणि नीलू घाईगडबडीने धावत होत्या. त्यांच्या मागे मागे हेमा आणि मिना ही धावत होत्या.आम्ही निघतो. तुम्ही पण चला पटकन.काय झालं ते बघू नंतर." आणि त्या ही सामान उचलून, स्वतःला सांभाळत गेल्या  सुद्धा.

माझी आणि बिना ची नजरा नजर झाली.आम्ही पटापट चार्जर बागेत टाकले आणि बॅगा उचलून त्यांच्या मागे पळालो. धावता-धावता मला एकदम हसायला आले.

आम्ही सगळ्या कशाला धावतोय ते कोणालाच माहित नव्हतं. अमिता पळाली.. म्हणून नीलू तिच्या मागे गेली.

 त्या दोन्ही धावल्या म्हणून हेमा आणि  मिना ही त्यांच्यामागे "काय झालं" म्हणून धावल्या.

 त्या चौघी धावत आहेत हे बघून तमन्ना आणि रुबी "काहीतरी झालं असेल" असा विचार करुन धावायला लागल्या. आणि आता आम्हीही त्यांच्या मागे सामान सांभाळत स्वतःला सावरत "कळेल" असा विचार करून त्या गोंधळात सामील झालो आणि धावायला लागलो.

आम्ही बोर्डिंग गेट जवळच्या एअरलाईन्सच्या काऊंटरवर पोहोचलो तेव्हा अमिता कर्मचाऱ्यांशी बोलत होती आणि का बोलावले याची चौकशी करत होती. 

आमच्या सगळ्यांच्या सामानाची आम्ही एकच स्लीप अमिताच्या नावाने बनवली होती त्यामुळे अमिताच्या नावानेच अनाउन्समेंट झाली होती.

"तुमच्या  सामानाच्या बॅगेत काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सिक्युरिटी ऑफिसरच्या रूममध्ये बोलावले आहे .चला." एअरलाईन्सची कर्मचारी म्हणाली .

मग आमचा सगळा गोतावळा सिक्युरिटी ऑफिसरच्या रूम कडे निघाला .

"नीलू, तुझी बॅग कुठे आहे ?" तिच्या हातात तिची बॅग न बघितल्यामुळे तमन्ना घाबरून ओरडली.

झाले काय की,अमिताने आपल्या नावाची अनाउन्समेंट ऐकली आणि नीलू ला "चल चल" करत सामान घेऊन कावऱ्याबावऱ्या अवस्थेत एअरलाईन्सच्या काउंटर कडे धावत निघाली.नीलू ही काही न कळल्यामुळे आपली बॅग न घेता तशीच तिच्या मागे धावली होती. आणि ह्या सगळ्या गडबडीत बाकीच्यांनाही तिची बॅग राहिली आहे ते कळलेच नाही.

" अय्या! माझी बॅग तिकडेच आहे.मी घेऊन येते. तुम्ही व्हा पुढे." असे म्हणत नीलूने  परत विरुद्ध दिशेने धावायला सुरुवात केली. तिची धांदल बघून एवढ्या  गोंधळात सुद्धा सगळ्यांना हसू आवरत नव्हते.

 सिक्युरिटी ऑफिसरच्या रूम मध्ये आम्ही सगळ्या पोहोचलो.

"तुमच्यापैकी तमन्ना आणि रुबी कोण आहेत?" ऑफिसर म्हणाले.

 तशा तमन्ना आणि रूबी पुढे झाल्या "आम्ही "

"बाकीच्या सगळ्यांनी रूम बाहेर जा. या दोघींच्या बॅगा उघडून तपासण्यात येतील.त्यांच्या बागेत "ऑब्जेक्शनेबल आईटम" आहेत." ऑफिसर म्हणाले.

 ते ऐकताच सगळ्यांची नजरानजर झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खटकन चिंतेचे जाळे पसरले. सगळ्याच आतून घाबरल्या .

 तमन्ना आणि रुबी ला धीर देऊनआम्ही बाहेर आलो तर निलू ही तिचे सामान घेऊन बाहेर उभी होती. रूमचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याने आत काय चालले आहे ते दिसत होते. तमन्ना आणि रुबी टेबलावर सुटकेस उघडून सामान दाखवत उभ्या होत्या.

" येथे खालच्या बाजूला बॉक्समध्ये काय आहे ते काढा." ऑफिसर कम्प्युटर स्क्रीन वर बघत म्हणाला.

"त्याच्यात मोबाईलची पॉवर बँक आहे." रुबी म्हणाली आणि बॉक्स उघडून दाखविला.

" तुमच्या बॅगेत?" ऑफिसरने तमन्नाला विचारले.

"हो माझ्या ही बागेत पॉवर बँक आहे." तमन्ना उत्तरली.

"पॉवर बँक चेक इन  लगेज मध्ये ठेवता येत नाही. नियम वाचले नाहीत का ? " एक क्षण एकदम शांतता पसरली.

आता पुढे काय वाढून ठेवलंय हा विचार करत असतानाच ऑफीसर म्हणाले,"पॉवर बँक तुमच्याकडे घ्या आणि सामान पुन्हा स्क्रिनिंगला घेऊन जा."

हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे सावट दूर झाले आणि जीवात जीव आला.मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारला .

सिक्युरिटी ऑफिसर बरोबर तमन्ना आणि रुबी परत लगेज स्क्रिनिंग साठी गेल्या. त्या परत येईपर्यंत आम्ही रूमच्या बाहेरच उभे होतो. मी विचारात गढले होते.

" काय झालं?" हेमा ने माझ्याकडे बघत विचारलं.

" काही नाही. ट्रीपला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली. The game has begun." मी एक  डोळा मारत बोलले.  सगळ्या मोठ्याने हसायला लागल्या..

 तमन्ना आणि रुबी आल्यावर पुन्हा सगळा ताफा विमान उड्डाणाच्या गेटकडे निघाला. आम्ही परत लेहच्या विमानाची वाट बघत बसलो. आता तर "पॉवर बॅंक" चा  पॉवरफुल विषय होता सगळ्यांकडे चघळायला.........!!

क्रमशः

ममता पार्सेकर




Comments

Popular posts from this blog

माझ्या मनातला गणपती

प्रवास

घराबाहेरच्या जगात आम्ही..१