शिव गंगा
शिव गंगा
स्वच्छंद फुलपाखरू एक होते बागडत निज विश्वात
पाहुनी मोहक ते बागडणे गुंतला त्याच्या रूपात
धावू नि मागे त्याच्या पकडले आपल्या करात
आनंदी फुलपाखरू ते सोडले प्राण एका क्षणात !
भावला तो सुमन एक फुलांच्या ताटव्यात
हवाहवासा वाटला अन् खूडले त्यास एका दमात
विसरूनी साऱ्या जगा भिनवला त्यास धुंध श्वासात
झडले मात्र सुमन ते गाळूनी पाकळ्या आसमंतात !
कथा नसे न्यारी नरनारी ची या जगतात
भाळला तीज वरी अन् घेरीले तीस बाहुपाशात
छाटले पंख मनीचे, धरिले प्रेमाच्या विळख्यात
गुदमरले मन, झुरले तन प्रेमाच्या अलक्ष पिंजऱ्यात !
जडला जीव कुणावरी, बहरूदे न्हाऊनी रंगात
नको पकडू, नको खुडू, नको जखडू, नाहक मोहात
घे सामावूनी या गंगेस तू शिवा सारखे अलगद जटात
तारेल जगतास या चालूनी डौलात..!!
ममता पार्सेकर

Superb... chhan shabda rachana
ReplyDelete