स्री सखी

स्री सखी

 सखी ! मैत्रीण ! नुसतीच मैत्रीण नाही तर जिवाभावाची मैत्रीण!  सखी, हा शब्द जरी मनात आला तरी मन सुखावून जाते शांत होते आणि आपण ही जर कुणाची सखी, जिवाभावाचे झालो तर मन अभिमानाने बहरते, फुलते. आयुष्यातले हे एकमेव असे नाते, ज्याला आपण स्वतः निवडलेले असते. निवडलेले म्हणण्यापेक्षा अलगद, हळूवार भावनांनी भारावलेले असते. सर्व नाती ही जन्मजात किंवा कुठल्या न कुठल्या अपेक्षा, भिती, आदर, मोह, आधार, दया या ना  अनेक भावनांनी प्रेरित, अवलंबून असतात. नात्यातल्या या अपेक्षा, भावना ती ती नाती अधोरेखित करतात. सखीच्या नात्यात काहीच अपेक्षा नसते, असते ते फक्त स्वातंत्र्य  आणि म्हणूनच ते सर्वात 'खास' असते. आपण जे आणि जसे आहोत तसे  ती स्वीकारते.कुठलेही स्त्री-पुरुष परिपूर्ण नसतात परंतु ही अपरिपूर्णता ओळखून हसत स्वीकारणे हे मात्र सखीच  करू शकते. सखीचे नाते हे असे  शब्दा पलीकडले असते. नुसत्या नजरेने किंवा डोळे बंद करून शांत बसून ह्या  सखीशी मनसोक्त संवाद करता येतो. जिथे शब्दही तोकडे पडतात किंवा त्यांची गरजही भासत नाही असे हे सखीचे नाते. सखी खरे तर स्वतःचे प्रतिबिंब असते कधी सावलीसारखे तर कधी आरशासारखे. कधीकधी एकरूप, एकजीव आणि स्वभावातल्या, विचाराच्या इतक्या समानता असतात की बघणारे अचंबित होतात आणि कधी कधी तर एकदमच विरुद्ध!  त्यानेही बघणारे अचबितच होतात!

सखी म्हणजे तुमच्या सुखाला द्विगुणित करणारी, हास्यात तुमच्या सोबत नाचणारी, गुणगुणणारी, तुमच्या आवडत्या गोष्टींवर मनसोक्त गप्पा मारणारी, तुमच्या सुखात तुडुंब न्हाऊन एकजीव होणारी. तर कधी कधी तुमच्या जखमी मनावर हळुवार फुंकर घालणारी,  गोंजारणारी, मनाला उभारी देणारी तर  कधी प्रेमाने ताशेरे मारून तुम्हाला शुद्धीवर आणणारी. कधी तास अन् तास फक्त तुमच्या सोबत बसून एक शब्द ही न उच्चारता बरेच काही शिकवून, समजावून जाणारी. 

आई - लेक , बहिणी - बहिणी, नणंद- भावजय, जावा-जावा ही नाती स्री सखीशी जवळीक साधणारी परंतु या नात्यातही  अधिकार, हक्क, द्वेष, राग  मधुन मधुन डोके वर काढत असतात आणि त्यामुळे सखीच्या परिभाषेपासून दूर....

एक विशिष्ट वय झाल्यावर मैत्री होणे असंभव नसले तरी कठीणच! ओळखीचे रूपांतर मैत्रीत होतेच असे नाही. मैत्रीच्या उंबरठ्यावर त्या ओळखीचे पाऊल सुद्धा पडत नाही. कदाचित जीवनातले अनुभव आपल्याला तो उंबरठा पार करू देत नाही. जर या मैत्रीत एक स्त्री आणि एक पुरुष असेल तर हा उंबरठा अजूनच कणखर आणि भव्य असतो. स्री सखी आणि पुरुष सखा यांचे नाते अजूनही समाज मान्य नाही. एखाद्या स्त्री चा पुरुष सखा असणे जेवढे भूवया उंचावणारे त्याहूनही एखाद्या पुरुषाची स्री सखी असणे म्हणजे चाकोरीबाहेरचीच  विचार सारणी! समाजाला हे नाते  समजणे, पचवणे अवघडच! स्री सखी आणि पुरुष सखा खरेच शक्य आहे का? याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. निसर्गनियमाप्रमाणे एक स्त्री आणि एक पुरुष यात आकर्षण असणारच, ओढ निर्माण होणारच. परंतु या टप्प्याला पार करून त्याचे एका सुंदर मैत्रीत रुपांतर होऊ शकते.  प्रत्येक मैत्री ही अध्यात्मिक स्वरूपाची असते ज्यात शारीरिक संबंध नसतात. अशी मैत्री जर स्त्री-पुरुषात असेल तर नक्कीच स्री, सखी आणि पुरुष, सखा होऊ शकतो. सखा- सखी च्या नात्यात काटेकोरपणे मर्यादा आणि नियम पाळले तर नकीच सुंदर मैत्री जन्माला येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्ण आणि द्रौपदी. कृष्णासारखा सखा नाही आणि द्रौपदी सारखी सखी नाही!

एकमेकांचा आदर हा कुठल्याही नात्याला उंचीवर नेतो आणि तो स्री सखी आणि पुरुष सखा ह्या नात्यात ही असावा. निखळ, निकोप, प्रामाणिक, निस्वार्थ आणि अध्यात्मिक मैत्री सर्वांनाच सुख, आनंद आणि मानसिक तृप्ती देते. स्री सखी असण्याचे भाग्य सगळ्यांनाच लाभेल असे नाही परंतु जर तुमची स्री सखी असेल तर तिला जपा. मैत्रीच्या नात्याला आपल्या प्रेम, विश्वास, आदराने वाढवा. हे नाते जेव्हा बहरू आणि मोहरू लागेल तेव्हा त्याच्या छायेत सखीशी  निवांतपणे मारलेल्या गप्पा किंवा फक्त शांतपणे बसून केलेले मनाचे संवाद जगातील समस्यांना, अडचणींना सामोरे जायची शक्ती देतील. 

जगाशी झगडून, पंख थकल्यावर या सखीच्या, मैत्रीच्या छायेत निवांत विसावल्यानंतर, एक नवा आत्मविश्वास, उमेद घेऊन  जगाशी एकरूप होण्यास, ..पंख फडकावून, उंच भरारी साठी सज्ज  व्हाल.....!!

ममता पार्सेकर



Comments

Popular posts from this blog

माझ्या मनातला गणपती

प्रवास

घराबाहेरच्या जगात आम्ही..१